Sunday, August 4, 2019

गुरू

निसर्ग हाच गुरू🥦
       संध्याकाळी सूरज आईसोबत बाजारात गेला होता. खरं तर पावसाचे दिवस होते .पण पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली होती.प्रसन्न असे वातावरण होते.
     सूरजच्या  आईने बाजारातुन आवश्यक सामान घेतले.पुढे ते दोघे फुलवाल्याकडे गेले.खूप गर्दी होती.आईने देवासाठी  फुले,हार घेतला आणि घरी यायला निघाली.
     सुरजने आईला विचारले,'आई,आज एवढी फुलवाल्यांकडे गर्दी का होती?' आई म्हणाली,अरे बाळा,उद्या गुरुपौर्णिमा आहे.देवाला,गुरूंना अर्पण करण्यासाठी सर्व फुले घेत होती.' सूरज म्हणाला म्हणजे नक्की काय ?गुरु म्हणजे कोण? ,घर येईपर्यंत सुरजचे कुतूहलवजा प्रश्न चालूच होते.
    आई म्हणाली ,गुरू म्हणजे जे आपल्याला ज्ञान देतात,योग्य दिशा दाखवितात,प्रेरणा देतात ते गुरू! सूरज आईच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला तू आई, शाळेतील शिक्षक,पुस्तके गुरू आहेत.आणखी कोण?
     दोघे घरी पोहोचले.आईने सामान ठेवले आणि सुरजला समजवण्याच्या स्वरात सांगितले,बघ आपण फुले आणली तीसुद्धा आपले गुरू आहेत.ती फुले ज्याच्यावर उमलतात ती झाडे म्हणजेच सर्व निसर्ग आपला गुरू आहे.आपण डोळस दृष्टीने सर्व पाहायला पाहिजे.
    गुलाब काट्यातुन उमलते .अडचणीतून आनंदाने बहरण्याचा संदेश देते.काही फुले सुगंधी तर काहीना सुगंध नाही पण दाराला तोरण,देवाला हार म्हणून उपयोगी अर्थात त्यांचे अल्पायुष पण त्यातही सर्वांचे जीवन सुगंधी, प्रसन्न करतात.आपल्याला मोलाचा संदेश त्यांच्या बहरण्यातुन देतात. एवढेच काय निसर्गातील प्रत्येक घटक परोपकारी आहे.झाडे ऊन,वारा, पाऊस,थंडी सोशून आपल्यासाठी ताठपणे उभे असतात.नदी कुठलाही भेदभाव न करता सर्वाना पाणी- जीवन देत प्रवाही असते.सूर्य प्रकाश-उष्णता देत आकाशी तेजोमय होऊन आपल्याला तेजोमय करत असतो.निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काही न काही उपयुक्त असे जीवनमूल्ये शिकवतो.मधमाशी तिच्याकडून चिकाटी,एकाग्रता शिकावी.वसुंधरा आपल्या गर्भातून आपल्याला अन्न देते.अशी अनेक गोष्टी-घटक जी निसर्गाचा भाग आहे.ती आपल्याला बहुमोल संदेश -मार्गदर्शन करतात.म्हणूनच ह्या निसर्गाची गुरूंची फक्त पूजा करून चालणार नाही तर त्याच्याप्रती कृतज्ञ राहून त्यांचे रक्षण संवर्धन आपण केले ,गुरूंचे तत्व,विचार अंमलात आणली की गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी होईल.
  सूरज म्हणाला,आई मला कळाले ,आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे -ज्ञान देऊन सुसंस्कारी बनवणारे ते गुरू!
   हो रे माझ्या बाळा असे म्हणत आईने सूरजची प्रेमाने पाठ थोपटली.गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरजने आईवडील,देवांना नमस्कार केला .तसेच सूर्य,झाडांनाही नमस्कार करून शाळेत गेला.जाताना आईला म्हणाला ,मी शाळेतुन आलो की आपण झाडे लावू व वाढवू!
    निसर्ग गुरुंचे आभार! त्यांच्यामुळेच जीवनाला प्रेरणा, दिशा मिळते.धन्यवाद🙏🏻
निसर्ग हा गुरू
कृतज्ञ राहून
करू संवर्धन-रक्षण!

सौ.ऋतुजा रविंद्र गवस
नवी मुंबई.

Saturday, August 3, 2019

मैत्री दिन 4 ऑगस्ट

मैत्री 
मैत्री असावी निखळ पारदर्शी
त्यात नसावा कुठलाच स्वार्थ
मैत्री ऋणानुबंधाची रेशीमगाठ
रेशीमगाठीची विण विश्वासाची

मैत्री श्रीकृष्ण सुदाम्यासारखी
त्यात नसावा भेदाभेद ,मत्सर
त्याग स्नेह सौहार्दभाव असावा
निशब्द भावनांची उकल व्हावी

मैत्रीत असावा सुखद विसावा 
असावी उत्तम विचारांची जोड
मैत्रीत दुनियादारी न येता
असावी फक्त दिल दोस्ती यारी
सौ.ऋतुजा गवस(गीता)

Wednesday, July 17, 2019

कविता

  बंधूप्रेम

माहेरी वडीलकीचा आधार
आम्हा बहिणीचा बंधू
खेळत, बागडत वाढलो
बंधू स्नेहाचा सागर

तू सर्वात लहान परि
आता जपतोस माहेरपण
आईबाबांच्या सेवेत सदा तू
कशाची नाही चणचण

कृष्णापरी मार्गदर्शक तू
भाच्यांचा लाडका मामा
स्वतःचा संसार करता
तत्पर सदा आमच्या कामा

राखीची रेशीमगाठ तू
आहेस आमचा अभिमान
शिकूनी झालास सज्ञानी
बंधू आमची शान!

सौ.ऋतुजा रविंद्र गवस
नवी मुंबई

बक्षिस

साथी नाट्य कला मंच समूह राज्यस्तरीय लेख स्पर्धा  उत्तेजनार्थ क्रमांकाने सन्मानित
विषय मनातला पाऊस (जून 2019)

Friday, July 12, 2019

कविता

फुलांची दुनिया 🌺🌹

स्वप्नात मी गेले
फुलांच्या दुनियेत
सुंदर मनोहारी
फुलांच्या बगिच्यात

गुलाब म्हणाले,
मी काटयातुनी बहरतो
फुलांचा राजा मी🌹
चहुबाजूला सुगंध पसरवितो

सदाफुली सदाबहरी
संदेश देई सदा फुलण्याचा
ना गंध,सुवास झेंडूला पण मान देवाच्या गळ्यात हाराचा

बाप्पाचे आवडते फूल म्हणे
नतमस्तक मी देवाच्या चरणी
अबोली निशब्दातच व्यक्त
मोगऱ्याचा सुगंध अंगणी

विविध रंग,आकारात फुले
सर्वाना सुगंधी, प्रसन्नतेचा वसा
फुलांच्या दुनियेत रमले मी
मधमाशीपरी कामाचा घेतला वसा🌺🌹🌹🌷💐🌸

सौ.ऋतुजा रविंद्र गवस

अभंग

12 जुलै आषाढी एकादशी

          विठ्ठल

पांडुरंग माझा |भक्तीचा भुकेला |
टाळ मृदुंगाला | आनंदला||१||

संतांचा मेळावा |त्याच्या चरणाशी |
जना उद्धारीशी | आशिर्वादे ||२||

एकोप्याची वारी| वारकरी दंग |
भजनात गुंग | भक्तगण ||३||

शाळाही पंढरी | विठ्ठल विद्यार्थी|
घडवू ज्ञानार्थी | सेवाव्रती ||४||

शाळा फुलवूनीू| संस्काराची शिधा |
करण्यास सदा | उपकारी||५||

दर्शनाची आस | मन घाली साद|
माऊलीचा ध्यास | अंतरंगी ||६||

जोडूनिया कर | हिच विनवणी |
रहावी धरणी | आनंदीत ||७|

६-६-६-४
दुसऱ्या तिसऱ्या ओळीत यमक

Thursday, July 11, 2019

गुणसम्राज्ञी पुरस्कार

प्रथम पुरस्कार - नवी मुंबई गुणसम्राज्ञी पुरस्कार
    2012 सालातील घटना. शाळा सुटली.मी सगळे आवरून घरी परतत होते.शाळेच्या थोडं पुढे येतेच तो एक मोठा बॅनर लावला होता.महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा -बक्षिस !मी सविस्तर सर्व वाचत होते.तितक्यात एक महिला बाजूने आल्या आणि म्हणाल्या मॅडम  गुणसम्राज्ञी स्पर्धेत सहभाग घ्या ! मी त्यांच्याकडे पाहिले  आणि हो बघते म्हणाले.पण कोण जाणे काय मला वाटले .मी बॅनर वरील फोन नंबर घेऊन फोन करून नोंदणी केली.
    महिला दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा नेरुळ  नवी मुंबई ला झाली.नवी मुंबई गुणसम्राज्ञी पुरस्कार स्पर्धा वाशी येथे 11 मार्च 2012 झाली.वाशी येथे स्पर्धेच्या वेळी विविध फेऱ्या झाल्या.शेवटी तीन नंतर। दोन ! असे करता करता निकाल लागला आणि मी प्रथम म्हणजेच नवी मुंबई गुणसम्राज्ञी पुरस्काराची मानकरी ठरले.व्यासपीठावर मुकुट,गुण सम्राज्ञी रिबीन ,मनोगत मला सर्व स्वप्नंवत वाटत होते.माझ्यासमोरअनेक सख्या आणि माझा 10 वर्षाचा मुलगा बसला होता.तो आनंदाने जोरजोरात टाळ्या वाजवत होता.वक्तृत्व स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळाला होता.त्याचेही बक्षिस मिळाले.
   पहिल्या पुरस्काराचा आनंद कायम मनात रुंजी घालत राहील.ज्या महिला सखीने मला सहजच म्हटले होते मॅडम सहभाग घ्या तिचेही आभार!
  आता अनेक बक्षिस, पुरस्कार मिळाले आहेत पण प्रथम पुरस्कार तोही गुण सम्राज्ञी !संसमरणीय आहे.

Wednesday, July 10, 2019

अष्टाक्षरी काव्यरचना

  निसर्गाशी मैत्री करू

निसर्गाशी मैत्री करू
वृक्षसंवर्धन करू
वसुंधरेला सजवू
जीवनी चैतन्य भरू

फळा,फुलांचा आस्वाद
ऋतूचक्राचा बहर
सृष्टीचे देखणे रूप
सृजनतेचा अंकुर

सिमेंटच्या जंगलाने
घाव घातला भूवरी
आक्रोश करी भूमाता
वनश्री फुलवा दारी

श्वास जीवनी निसर्ग
निसर्गाची धरा कास
दुष्काळ संपून जाई
सुकाळ जगण्या आस

वर्षा समृद्धीकारक
प्राणी,पक्षी आश्रयस्थ
जगण्याचा प्राणवायू
निसर्गच जीवनस्थ

चारोळी


   ड्रग्ज
ड्रग्जची फॅशन जीवघेणी
जीवनाचा अंत ओढवी
सुंदर जीवन फुलण्याआधीच
नरकाच्या दारात पाठवी

    
   विरह
तुझ्या विरहात
चालू माझा श्वास
हृदयस्थ आठवणीत
बंदिस्त  श्वास
   
       आसरा


  सिमेंटची जंगले
  गगनाला भिडती
  मानवी कृत्ये
  दुष्कृत्याकडे जाती
  
    हिरावूनी घेता
     वन्यपाखराचा निवारा
      आक्रोश करी
     वसुंधरेचा आसरा

आठवण

आठवणीतला पाऊस

    आठवणीतला पाऊस  म्हणताक्षणी मला माझे बालपण आठवले आणि तोच खरा स्मृती पटलावरील पाऊस!  .लहानपणी सुट्टी पडली  की गावी(कोकण) जात असे.उन्हाळा संपत आला की मिरगवणीची तयारी  घरातील ज्येष्ठ मंडळी करत. सात जून मिरग सुरू-पाऊस येतलो तयारी करूक होई असे म्हणत तयारी सुरू आणि खरंच पाऊस  सात जून जूनच्या पहिल्या आठवड्यात येई.मिरग सुरू.!आम्ही लहान मुले ह्या पावसात मुक्तपणे भिजू आणि मग जेवणार मनसोक्त ताव ! निरागस बालपण ह्या मनातील पावसात मनसोक्तपणे विहरत असे.शेतकरी शेतात खोळ(  प्लॅस्टिकचा कागद) डोक्यावर घेऊन  शेतातील कामे करत.मुंबईला आल्यावर मग काय छत्री,रेनकोट घालून  शाळेत पालकांसोबत जात असे.गावचा-मुंबईचा पाऊस तोच! पण पाऊस अंगावर झेलण्याची पद्धत वेगळी!
     आठवणींतला पाऊस वेगळा तो काय?  सुखद अनुभूती घेता येणे,  बळीराजा शेतात जाऊन सर्वांच्या उदरभरणासाठी राबतोय आणि स्वतःही त्याचा आनंद घेतोय.
    मोठे झाल्यावर मनातला आठवणींतला  पाऊस आकाशातून जमिनीवर येत होता तशी चातकाप्रमाणे त्याची वाट बघतच असतो पण ह्या पावसात एक अवखळ अदा असते.मनाची हाक असते,कुणाची तरी वाट पाहत त्याच्यासोबत भिजण्याची आस मनाला गारवा देते.प्रियकर-प्रेयसी हा पाऊस तनामनात झेलत प्रेमात अखंड भिजून जातात .हा पाऊस ओलावा कायम स्मृती पटलावर असतो.
    आठवणींतला पाऊस सुखकारक,जीवनदायी,सृजना ची निर्मिती करणारा  असतो.अर्थात प्रत्यक्षात त्याचे स्वरूप बदलले.त्याला कारण आपण माणसेच!   पाऊस लांबला,मिरगाची मिरगवणी दुरापास्त झाली .असे असले तरी  अजूनही वेळ गेली नाही आपल्या मनातील सुखकारक, जीवनदायिनी मृगसरी नक्की बरसतील!
     आपण पाणी अडवून जिरवूया,वृक्षारोपण-संवर्धन करूया ,प्राणी पक्षी निवारे संवर्धन करुनी मोराला नाच  रे मोरा आंब्याच्या वनात त्यासाठी वन जंगल सुरक्षित करूया म्हणून मनातील पाऊस वास्तवात नक्की येईल.
     आनंदाचा परमानंद तू
      वसुंधरेचा ध्यास तू
      मनीची आस तू
      आठवणीतला पाऊस तू!

हायकू रचना

हायकू रचना

        प्रतीक्षा

   वसुंधरेला
   प्रतीक्षा पावसाची
   आस मनीची

चातकालाही
आस जलधारेची
समाधानाची

धरा कंपित
भेगाळली अवनी
तिष्ठत जनी

डोळे शिणले
बळीराजा तिष्ठत
पशु वंचित

सजीव करी
याचना जगण्याची
संपन्नतेची

सौ.ऋतुजा रविंद्र गवस

     धागे विश्वासाचे

तुझ्या माझ्या नात्यातील
स्नेहबंध प्रेमाचे
रेशीमगाठी संसारातील
धागे विश्वासाचे

सुखदुःखाच्या प्रपंचात
एकमेकांचा हात साथीला  
मात करी अडचणीवर       
धागे विश्वासाचे

सुखी संसाराचा ध्यास
सामंजस्य, सहकार्याची कास
नाते आपुले अभेद्य
धागे विश्वासाचे

मुक्तक। काव्य प्रकार
      मृदगंध

वर्षाराणी बरसली
मृदगंध सर्वत्र दरवळला
वसुंधरा आनंदली
मृदगंध सर्वत्र दरवळला

सुखकारक, प्रलयकारक
जीवनदायी विविध रूपे तुझी
चैतन्यमयीं प्रकटली
मृदगंध सर्वत्र दरवळला

पाऊस

सुखविती मृगधारा 🌨
  चातकापरी वाट पाहता
  बरसल्या मृगधारा
  झाली फुलकीत सृष्टी
  आनंदली वसुंधरा

   बळीराजा स्वानंदे शेतात
   वाहती निर्झर खळाळत
   हिरवा शालू सृष्टीला
   चैतन्य साऱ्या आसमंतात

   सृजनाची निर्मिती मृगधारेत
   काव्य  स्फुरती काव्यमनी
   ओलेचिंब प्रियकर बाहुपाशात
   इंद्रधनुचे तोरण गगनी

   वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन
   जलबंधारे संकल्प राबवूनी
   जीवन संजीवन करण्यास
   सुखविती मृगधारा मनोमनी

लेखन

मी का लिहिते ?   🖋🖊
माझे लेखन - माझी ऊर्जा
     
         स्वतःला अभिव्यत करण्याचा,स्वतःलाच गवसून पुढे मार्गस्थ होण्याचा यशस्वी मार्ग ! स्वतःच्या जगण्याला,अस्तित्वाताला अर्थपूुर्णता
येते आणि त्याचा मला स्वतःला अनुभवही येत आहे.
      विद्यार्थीदशेत असताना कविता,लेख लिहीत होते.पण ते मर्यादित स्वरूपातच राहिले.ही कुपी मनाच्या एका कोपऱ्यात लपून राहिली.पण अनेक वर्षांनी ही कुपी उघडली आणि सुंगंधित झाले.मनाची दारे उघडली.कविता,लेख लिहिण्यास नकळतपणे पुन्हा सुरवात केली आणि माझ्या ह्या लेखनामुळे मला ऊर्जा मिळाली. सर्व नकारात्मक विचार बाजूला गेले आणि पुढे जाण्यास प्रेरणा मिळाली.कविता,निंबध, लेख ह्यातून अभिव्यक्त होऊ लागली.
      कविता  ही उत्स्फूर्त असते.ती सहजपणे मनात स्फुरते अन लेखणीतून उतरते.आता मला अमुक विषयावर कविता करायची आहे अन कविता लगेच लिहिली असे होत नाही.सहज हळूवारपणे उलगडणारी रेशीम गाठ असते.वेळ कधीच नसतो  पण असेल आवड तर मिळेल सवड !आपल्या आवडीसाठी छंदासाठी वेळ काढावाच लागतो अन तो आपोआप आवडीतून मिळतो.अनेक साहित्यिक ह्यांचे साहित्य वाचन करू लागले.आणि मग वाचन,लेखनअभिव्यक्ती ह्या साखळीचा मला छंदच लागला.एवढेच काय रोजची दैनंदिनी लिहिण्याची सवय  होती.फक्त लिहून ठेवायची आणि मन हलकं करत असे.आता त्याला योग्य दिशा मिळाली.
     मी स्वतः नोकरी करते. शिक्षिका आहे .संसार ..नोकरी ही वाटचाल माझ्या आवडी ,छंद जोपासत करत  आहे.स्वानुभव,निरीक्षण,कल्प्नाप्रवास,माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यसोबतच्या गमतीजमती,अनुभव,वाचन,समाजात घडणाऱ्या घडामोडी,गोष्टी अशा विविध विषयावर कविता,लेख,निबंध,पथनाट्य,गोष्टी स्वअभिव्य्क्तीतून लेखणीतून उतरवण्याचा प्रयत्न करते.स्वतःला आनंद देण्यासाठी,व्यक्त होण्यसाठी,विकसित करण्यासाठी माझी साहित्यससुमनांजली उपयोगी पडते.माझ्या शिक्षकी पेशामुळे निरागस मुले त्याचसोबतचे अनुभव लिखाणास प्रेरणा देतात.वर्तनमानपत्र, मासिक ह्यातून कविता,लेख प्रकाशित होतात. स्वतःची शाळा, संस्था ह्यांचे वृत्त लेखन करते.विद्यार्थ्यांनाही चला वाचूया, लिहुया सदराखाली वाचन,लेखनास प्रवृत्त करते.शाळेत ,घरी वाचनकोपरा, वाचनकट्टा राबविते.सोशल मीडियावरही माझे लेखन चालू असते. मी  जास्त रमते ती कवितेत.कवितेच्या भावविश्वात मी हरवून जाते.
  कविता जेंव्हा स्फुरेल तेंव्हा लगेच लेखणीतून कागदावर उतरवते.लेख रात्री घरातील कामे आटोपल्यावर लिहिते..जीवनात सुखदुखाचे अनेकप्रसंग येतात.त्यांना मी लेखणीतून अभिव्यक्त करते.अन मी रीलेक्स होते.माझा छंद.आवड मला अपडेट ठेवते.मन प्रसन्न राहते.वाचन,.श्रवण जुनी गाणी ऐकल्यामुळे कान व मन सुमधुर करतात.वाचनाशिवाय पर्याय नाही.
    माझे लेखन माझी ऊर्जा आहे.मी लहान मुलांना शिकविते(प्राथमिक शिक्षिका) लहान मुलांमध्ये तर भरपूर ऊर्जा असते.ही मुले कधीच थकत नाही.त्यामुळे मी पण मनाने चिरतारण्याचा अनुभव घेते.आणि ह्या चिरतारुण्याला साथ माझ्या छंदाची! मुलांसाठी अनेक उत्स्फूर्तपणे कविता,गाणी ,गोष्टी त्यांच्यासमोर सादर करते आणि त्यांच्याकडूनही करून घेते.त्यांच्याबरोबर रमतात सर्व विसरून वेगळाच उच्चकोटींचा आनंद मिळतो.त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते.मन कधीच थकत नाही.मग माझे विद्यार्थी पण प्रोत्साहन मिळताच त्यांच्या भाषेत लेखन करतात.माझी विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी मार्गदर्शनासाठी घरी येतात.त्यांना मार्गदर्शन करताना स्वतःलाही शिकायला मिळते ,नवीन अनुभव मिळतो .शाळेत कार्यक्रमाचे निवेदन करताना माझा छंद मला उपयोगी पडतो.चारोळी,कविता ह्या स्वरचित निवेदनात उवयोगी पडतात.खरं तर लेखणी हे माझे शिक्षक म्हणून महत्वाचे साहित्य शस्त्र आहे.त्याचा योग्य उपयोग करून साहित्यनिर्मितीचा आनंद मी घेत आहे.
   माझ्या घरी हॉलमध्ये दोन्ही बाजूला नारळाची झाडे आहेत.मी हॉलमध्ये बसून लेखन,वाचन करते.झाडावरील पक्षी त्यांचा किलबिलाट ,झावळीतून डोकावणारा चंद्र मन प्रसन्न करते आणि लेखणीतून नकळतपणे काव्य स्फुरते.
     घरातील कामे  करतानाही काहीतरी सुचते ,आठवते आणि मनाच्या कॅनव्हासवर ते उमटते कायम स्वरूपात! आणि मग लेखणीतून कागदावर!

      कविता ,लेख ,वाचन साहित्यसुमनाजलीमुळे. मी आनंदी होते व हा आनंद स्वअभिव्यक्तीतून उतरवण्याचा प्रत्यन करते .कविता,निंबध लेखनासाठी मला अनेक पुरस्कार मिळाले आहे.जसे माझ्या लहान मुलांना छान ,शाब्बास कौतुकाची थाप मिळाली की आनंद होतो तसेच अशा बक्षिसामुळे पुढे वाटचाल करण्यास प्रेरणा मिळते. ह्यात माझ्या कुंटूबाची मला साथ आहे अन माझ्यातला शिक्षक माझ्या सोबतीला आहे.,ह्याचा अभिमान आहे.आपण खूप थकलो की लिंबूसरबत पितो.मग थोडी तरतरी येते.पण माझा छंदच माझी ऊर्जा आहे.घरात,शाळेत,प्रवासात कुठंही असू द्या माझ्याबरोबर -माझ्या मनात माझा छंद असतोच ! कधीही साथ सोडत नाही आणि सुटणारही नाही.हिरकणीचे वात्सल्य, झाशीच्या राणीची धडाडी,सावित्रीबाई फुलेंचा शिक्षणवसा, गरुडभरारीची झेप मला माझा छंद देतो. चुलमूल ह्यातून बाहेर पडून भरारी घेण्याचे बळ माझे लेखन  देते्.लेखणीची मी आभारी🙏🏻
  गवसला स्वतः ती गवसली तिच्या लेखनातून!🖋

  

ऋतूकाव्य- कविता,लेख,अनुभव

कविता

   तू मला गवसली
    अंतरगीच्या डोहात
     खोल खोल जाताना
      माझाच तळ मला सापडला
      तू माझी सुखदुःखाची सखी
      मनाची कवाडे उघडून
      लेखणीतून शब्दरूपात
      भावभावनांची अभिव्यक्ती
      मनाचे कोंदण उघडून
      मुक्तपणे विहरणारी
       ऋतुजाला गवसून
       स्वअस्तित्वास प्रेरणा
        प्रोत्साहन देणारी
        माझी सखी कविता