Sunday, August 4, 2019

गुरू

निसर्ग हाच गुरू🥦
       संध्याकाळी सूरज आईसोबत बाजारात गेला होता. खरं तर पावसाचे दिवस होते .पण पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली होती.प्रसन्न असे वातावरण होते.
     सूरजच्या  आईने बाजारातुन आवश्यक सामान घेतले.पुढे ते दोघे फुलवाल्याकडे गेले.खूप गर्दी होती.आईने देवासाठी  फुले,हार घेतला आणि घरी यायला निघाली.
     सुरजने आईला विचारले,'आई,आज एवढी फुलवाल्यांकडे गर्दी का होती?' आई म्हणाली,अरे बाळा,उद्या गुरुपौर्णिमा आहे.देवाला,गुरूंना अर्पण करण्यासाठी सर्व फुले घेत होती.' सूरज म्हणाला म्हणजे नक्की काय ?गुरु म्हणजे कोण? ,घर येईपर्यंत सुरजचे कुतूहलवजा प्रश्न चालूच होते.
    आई म्हणाली ,गुरू म्हणजे जे आपल्याला ज्ञान देतात,योग्य दिशा दाखवितात,प्रेरणा देतात ते गुरू! सूरज आईच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला तू आई, शाळेतील शिक्षक,पुस्तके गुरू आहेत.आणखी कोण?
     दोघे घरी पोहोचले.आईने सामान ठेवले आणि सुरजला समजवण्याच्या स्वरात सांगितले,बघ आपण फुले आणली तीसुद्धा आपले गुरू आहेत.ती फुले ज्याच्यावर उमलतात ती झाडे म्हणजेच सर्व निसर्ग आपला गुरू आहे.आपण डोळस दृष्टीने सर्व पाहायला पाहिजे.
    गुलाब काट्यातुन उमलते .अडचणीतून आनंदाने बहरण्याचा संदेश देते.काही फुले सुगंधी तर काहीना सुगंध नाही पण दाराला तोरण,देवाला हार म्हणून उपयोगी अर्थात त्यांचे अल्पायुष पण त्यातही सर्वांचे जीवन सुगंधी, प्रसन्न करतात.आपल्याला मोलाचा संदेश त्यांच्या बहरण्यातुन देतात. एवढेच काय निसर्गातील प्रत्येक घटक परोपकारी आहे.झाडे ऊन,वारा, पाऊस,थंडी सोशून आपल्यासाठी ताठपणे उभे असतात.नदी कुठलाही भेदभाव न करता सर्वाना पाणी- जीवन देत प्रवाही असते.सूर्य प्रकाश-उष्णता देत आकाशी तेजोमय होऊन आपल्याला तेजोमय करत असतो.निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काही न काही उपयुक्त असे जीवनमूल्ये शिकवतो.मधमाशी तिच्याकडून चिकाटी,एकाग्रता शिकावी.वसुंधरा आपल्या गर्भातून आपल्याला अन्न देते.अशी अनेक गोष्टी-घटक जी निसर्गाचा भाग आहे.ती आपल्याला बहुमोल संदेश -मार्गदर्शन करतात.म्हणूनच ह्या निसर्गाची गुरूंची फक्त पूजा करून चालणार नाही तर त्याच्याप्रती कृतज्ञ राहून त्यांचे रक्षण संवर्धन आपण केले ,गुरूंचे तत्व,विचार अंमलात आणली की गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी होईल.
  सूरज म्हणाला,आई मला कळाले ,आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे -ज्ञान देऊन सुसंस्कारी बनवणारे ते गुरू!
   हो रे माझ्या बाळा असे म्हणत आईने सूरजची प्रेमाने पाठ थोपटली.गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरजने आईवडील,देवांना नमस्कार केला .तसेच सूर्य,झाडांनाही नमस्कार करून शाळेत गेला.जाताना आईला म्हणाला ,मी शाळेतुन आलो की आपण झाडे लावू व वाढवू!
    निसर्ग गुरुंचे आभार! त्यांच्यामुळेच जीवनाला प्रेरणा, दिशा मिळते.धन्यवाद🙏🏻
निसर्ग हा गुरू
कृतज्ञ राहून
करू संवर्धन-रक्षण!

सौ.ऋतुजा रविंद्र गवस
नवी मुंबई.

Saturday, August 3, 2019

मैत्री दिन 4 ऑगस्ट

मैत्री 
मैत्री असावी निखळ पारदर्शी
त्यात नसावा कुठलाच स्वार्थ
मैत्री ऋणानुबंधाची रेशीमगाठ
रेशीमगाठीची विण विश्वासाची

मैत्री श्रीकृष्ण सुदाम्यासारखी
त्यात नसावा भेदाभेद ,मत्सर
त्याग स्नेह सौहार्दभाव असावा
निशब्द भावनांची उकल व्हावी

मैत्रीत असावा सुखद विसावा 
असावी उत्तम विचारांची जोड
मैत्रीत दुनियादारी न येता
असावी फक्त दिल दोस्ती यारी
सौ.ऋतुजा गवस(गीता)

Wednesday, July 17, 2019

कविता

  बंधूप्रेम

माहेरी वडीलकीचा आधार
आम्हा बहिणीचा बंधू
खेळत, बागडत वाढलो
बंधू स्नेहाचा सागर

तू सर्वात लहान परि
आता जपतोस माहेरपण
आईबाबांच्या सेवेत सदा तू
कशाची नाही चणचण

कृष्णापरी मार्गदर्शक तू
भाच्यांचा लाडका मामा
स्वतःचा संसार करता
तत्पर सदा आमच्या कामा

राखीची रेशीमगाठ तू
आहेस आमचा अभिमान
शिकूनी झालास सज्ञानी
बंधू आमची शान!

सौ.ऋतुजा रविंद्र गवस
नवी मुंबई

बक्षिस

साथी नाट्य कला मंच समूह राज्यस्तरीय लेख स्पर्धा  उत्तेजनार्थ क्रमांकाने सन्मानित
विषय मनातला पाऊस (जून 2019)

Friday, July 12, 2019

कविता

फुलांची दुनिया 🌺🌹

स्वप्नात मी गेले
फुलांच्या दुनियेत
सुंदर मनोहारी
फुलांच्या बगिच्यात

गुलाब म्हणाले,
मी काटयातुनी बहरतो
फुलांचा राजा मी🌹
चहुबाजूला सुगंध पसरवितो

सदाफुली सदाबहरी
संदेश देई सदा फुलण्याचा
ना गंध,सुवास झेंडूला पण मान देवाच्या गळ्यात हाराचा

बाप्पाचे आवडते फूल म्हणे
नतमस्तक मी देवाच्या चरणी
अबोली निशब्दातच व्यक्त
मोगऱ्याचा सुगंध अंगणी

विविध रंग,आकारात फुले
सर्वाना सुगंधी, प्रसन्नतेचा वसा
फुलांच्या दुनियेत रमले मी
मधमाशीपरी कामाचा घेतला वसा🌺🌹🌹🌷💐🌸

सौ.ऋतुजा रविंद्र गवस

अभंग

12 जुलै आषाढी एकादशी

          विठ्ठल

पांडुरंग माझा |भक्तीचा भुकेला |
टाळ मृदुंगाला | आनंदला||१||

संतांचा मेळावा |त्याच्या चरणाशी |
जना उद्धारीशी | आशिर्वादे ||२||

एकोप्याची वारी| वारकरी दंग |
भजनात गुंग | भक्तगण ||३||

शाळाही पंढरी | विठ्ठल विद्यार्थी|
घडवू ज्ञानार्थी | सेवाव्रती ||४||

शाळा फुलवूनीू| संस्काराची शिधा |
करण्यास सदा | उपकारी||५||

दर्शनाची आस | मन घाली साद|
माऊलीचा ध्यास | अंतरंगी ||६||

जोडूनिया कर | हिच विनवणी |
रहावी धरणी | आनंदीत ||७|

६-६-६-४
दुसऱ्या तिसऱ्या ओळीत यमक

Thursday, July 11, 2019

गुणसम्राज्ञी पुरस्कार

प्रथम पुरस्कार - नवी मुंबई गुणसम्राज्ञी पुरस्कार
    2012 सालातील घटना. शाळा सुटली.मी सगळे आवरून घरी परतत होते.शाळेच्या थोडं पुढे येतेच तो एक मोठा बॅनर लावला होता.महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा -बक्षिस !मी सविस्तर सर्व वाचत होते.तितक्यात एक महिला बाजूने आल्या आणि म्हणाल्या मॅडम  गुणसम्राज्ञी स्पर्धेत सहभाग घ्या ! मी त्यांच्याकडे पाहिले  आणि हो बघते म्हणाले.पण कोण जाणे काय मला वाटले .मी बॅनर वरील फोन नंबर घेऊन फोन करून नोंदणी केली.
    महिला दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा नेरुळ  नवी मुंबई ला झाली.नवी मुंबई गुणसम्राज्ञी पुरस्कार स्पर्धा वाशी येथे 11 मार्च 2012 झाली.वाशी येथे स्पर्धेच्या वेळी विविध फेऱ्या झाल्या.शेवटी तीन नंतर। दोन ! असे करता करता निकाल लागला आणि मी प्रथम म्हणजेच नवी मुंबई गुणसम्राज्ञी पुरस्काराची मानकरी ठरले.व्यासपीठावर मुकुट,गुण सम्राज्ञी रिबीन ,मनोगत मला सर्व स्वप्नंवत वाटत होते.माझ्यासमोरअनेक सख्या आणि माझा 10 वर्षाचा मुलगा बसला होता.तो आनंदाने जोरजोरात टाळ्या वाजवत होता.वक्तृत्व स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळाला होता.त्याचेही बक्षिस मिळाले.
   पहिल्या पुरस्काराचा आनंद कायम मनात रुंजी घालत राहील.ज्या महिला सखीने मला सहजच म्हटले होते मॅडम सहभाग घ्या तिचेही आभार!
  आता अनेक बक्षिस, पुरस्कार मिळाले आहेत पण प्रथम पुरस्कार तोही गुण सम्राज्ञी !संसमरणीय आहे.